घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी अटकेत, १८ गुन्हे उघडकीस
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरासह ठाणे ग्रामीण, मुंबई शहर व कोल्हापूर परिसरात घरफोडी व दुकानफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १३/२०२६ अंतर्गत भा. न्या. सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३(५), ६२ अन्वये ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी अनिल सखाराम परबळकर यांच्या अर्थव मेडिकल शॉपसह इतर पाच दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल व रोख रक्कम चोरली होती. या प्रकरणाचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेने बातमीदारांकडून मिळालेली माहिती व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपी निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनयकुमार कृपाशंकर पासवान (वय २१), प्रदीप रामबहादुर निशाद (वय २०), राजविर संजूसिंग लाहोरी (वय १९) आणि सलमान अली अहमद अली शेख (वय २२) यांचा समावेश आहे. यातील राजविर लाहोरी याला गुजरातमधील बिलीमोरा येथून तर सलमान शेख याला पुण्याजवळील देहुरोड येथून ताब्यात घेण्यात आले.
तपासात या टोळीने रिक्षा व दुचाकी चोरी करून त्या वाहनांचा वापर गुन्ह्यांसाठी केल्याचे समोर आले आहे. किराणा दुकाने व मेडिकल शॉपचे शटर उचकटून घरफोडी करणे ही त्यांची कार्यपद्धत होती. सध्या सर्व आरोपी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून तपासादरम्यान त्यांच्याकडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली.