पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या हरकतींवर नजर ठेवण्यासाठी ‘तिसरा डोळा;३७ स्थानकांवर बसवणार शेकडो सीसीटीवी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मालाडमध्ये भरदिवसा रेल्वे स्थानकावर एका प्राध्यापकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला असून मुंबई पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आता रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्थानकावर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतच चालले आहे. आता अशातच या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. यापूर्वी देखील रेल्वे स्थानकावर सीसीटिव्ही कॅमेरे होते, परंतू आता आणखीन कॅमेरे बसवण्याचे काम देण्यात आले आहेत.
मालाडमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कॅमेऱ्याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरातील स्थानकांवर सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्यासाठी सुरूवात केली आहे. उपनगगरीय रेल्वेवरील ३७ स्थानकांवर २०० ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सुरूवात केली आहे. या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेल्वेच्या दक्षता विभागालाही तिकिट तपासणीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागामध्ये तिकीट कार्यालये, तिकिट बुकिंग काउंटर आणि प्रवाशांसोबत थेट संपर्क येणाऱ्या ठिकाणी सुमारे २५.८१ कोटी रुपयांचे सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
७.१ कोटी रुपये खर्चून २९ प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर ३१ अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS)-कम-PRS स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, ज्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक गर्दी असलेल्या तिकीट केंद्रांवरील सुरक्षा वाढणार आहे. १२.३९ कोटी रुपये खर्चून ६८ UTS स्थानकांवर अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती स्वत: रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, जे तिकीट नसलेले प्रवासी अधिकाऱ्यांना दमदाटी करतात, त्यांना धमक्या देणे, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणे यांसारख्या घटनांना आता आळा बसणार आहे. विशेषत: रोख रक्कम हाताळणाऱ्या बुकिंग क्लार्कच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी आहे.
याव्यतिरिक्त, ६.३० कोटी रुपये खर्चून, रेल्वे स्थानकांवरील ४० टीसींचे ऑफिसेस आणि ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर (टीटीई) यांच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, २५.८१ कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीचा उद्देश तिकीट आणि बुकिंग कर्मचार्यांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण करणे आहे, कारण मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अधिकाऱ्यांना गर्दी, भाड्यावरून वाद आणि दंड आकारला जातो तेव्हा आक्रमक वर्तनाचा सामना करावा लागतो.