‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक; आंतरराज्य टोळीतील एकाला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी : बेंगळुरू पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँक खात्यातून तीन कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची खोटी भीती दाखवून संशयिताने त्यांना जाळ्यात ओढले. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक विश्लेषण तसेच संबंधित बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलिसांचे पथक मुंबई व ठाणे येथे रवाना झाले. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने सापळा रचून २३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. तपासाच्या दृष्टीने आरोपीचे नाव सध्या जाहीर करण्यात आलेले नाही. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप नाईक, कॉन्स्टेबल अजिंक्य ढमढेरे, सौरभ कदम, रोहन कदम आणि नीलेश शेलार यांच्या पथकाने केली. या फसवणुकीमागील संपूर्ण टोळी उघडकीस आणण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.