ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशनचा मार्ग मोकळा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशनचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली असून, यामुळे ठाणे आणि मुलुंड परिसरातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या या नवीन रेल्वे स्टेशनचा प्रश्न केवळ निधीअभावी रखडला होता. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली होती आणि जवळपास ६० टक्के काम पूर्णही झाले होते. मात्र, सुरुवातीला १२० कोटी रुपये असलेला या प्रकल्पाचा खर्च आता वाढून २४५ कोटी रुपयांच्या पार गेला आहे. मार्च २०२५ मध्ये स्मार्ट सिटी मिशनची मुदत संपत असल्याने वाढीव निधी कोठून येणार, असा मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या प्रकल्पाचा सर्व खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पासाठी खासदार नरेश म्हस्के आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संसदेत आवाज उठवण्यासोबतच त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. रेल्वे मंत्रालय आणि इतर यंत्रणांमधील समन्वयाअभावी काम थांबू नये, यासाठी त्यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही आग्रही भूमिका मांडली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार म्हस्के आणि खासदार शिंदे यांनी पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या प्रकल्पाची सर्व कामे तात्काळ सुरू केली जातील, असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे नवीन स्टेशनचे काम आता वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे नवीन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्टेशनवरील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.