आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शाळेत विद्यार्थ्यासोबत रॅगिंग,डोक्यावरील तसेच भुवयांचे केस कापल्याचा संतापजनक प्रकार
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघरमधील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी झोपेत असताना त्याच्या डोक्यावरील तसेच भुवयांचे केस कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या चास येथील आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थांचे रात्री झोपेत असताना कुणीही तरी विचित्रपणे डोक्यावरील केस कापले तसेच डोळ्यावरील भुवयांचे केस देखील कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस कापताना जखम देखील झाली आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त करून याबाबत दोशिंवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र हा गंभीर प्रकार घडत असताना वसतिगृहातील अधीक्षक, मुख्याद्याक काय करतात असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासी आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असताना रॅगिंग सारख्या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.