गिरगावातील गुजराती रेस्टॉरंटमध्ये मराठी भाषेवरून मनसेचा तुफान राडा;१५ दिवसांत कार्यवाहीची मागणी

Spread the love

गिरगावातील गुजराती रेस्टॉरंटमध्ये मराठी भाषेवरून मनसेचा तुफान राडा;१५ दिवसांत कार्यवाहीची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील गिरगाव भागातील एका रेस्टॉरंटला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले आहे. या रेस्टॉरंटमधील मेन्यू गुजराती भाषेत होता. येथील सर्व व्यवहार देखील गुजराती भाषेतच केले जात होते. याच मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन मालकाला एक निवेदन पत्र दिले. या पत्रात मराठीत मेन्यू, साइनबोर्ड नसण्याबद्दल तीव्र आक्षेप घेत योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर पुढच्या पंधरा दिवसात हे झालं नाही तर मनसे स्टाईलने ते करून घेतले जाईल असा इशारा ही देण्यात आला.

मनसेने रेस्टॉरंट मालकाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आपण अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात व्यवसाय करत आहात. आपल्या ग्राहकांमध्ये मराठी ग्राहकांची संख्या मोठी आहे. असे असूनही, आम्ही पाहिले आहे की तुम्ही मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहात. तुमच्या दुकानाचा साइनबोर्ड गुजराती भाषेत आहे, मराठीत नाही. तसेच, दुकानाच्या आतील बोर्डही केवळ गुजराती लोकांना समजेल अशा भाषेत आहेत. “काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाने मराठीत पक्कं बिल मागितल्यावर रेस्टॉरंट मालकाने गुजराती भाषेतच बिल देणार असल्याचे सांगितले. स्थानिक भाषा किंवा स्थानिक लोकांना समजेल अशा भाषेत बिल देणे बंधनकारक असताना केवळ गुजराती भाषेचा वापर का केला जात आहे, असा सवाल मनसेने पत्रातून विचारला आहे. याद्वारे, दुकानदार जाणूनबुजून मराठी भाषेचा अपमान करत आहेत का, असेही विचारण्यात आले. ‘आपण विसरलात की महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे, की तुम्ही हेतुपुरस्सरपणे मराठी भाषेची उपेक्षा करत आहात,’ असे परखड मत पत्रात व्यक्त करण्यात आले.

मनसेने रेस्टॉरंट मालकाला मराठी भाषेच्या सन्मानासाठी पुढील १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. दुकानाचे नाव-बॅनर आणि आतील सर्व बोर्ड मराठी भाषेत असावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रेस्टॉरंट मालकाने मनसेच्या या निवेदन पत्रावर आपली स्वाक्षरी गुजराती भाषेतच केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon