ऑनलाईन गेमिंग आणि शेअर मार्केटचा नाद चक्क बँक मॅनेजरच बनला चोर; १ कोटी ७ लाख घेऊन नागपुरला फरार
योगेश पांडे वार्ताहर
भंडारा – ऑनलाईन गेमिंगच्या नादात तरुणाई स्वत:चं आर्थिक नुकसान करुन कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी धाराशिवमध्ये एका युवकाने ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर ऑनलाईन जुगार आणि गावखेड्यातील तरुणाईचा मुद्दा चर्चेत आला. मात्र, अद्यापही ऑनलाईन जुगाराच्या नादात तरुणाई आर्थिक खाईत जात असल्याचं दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या तुमसर येथील कॅनरा बँकेतील सहायक मनेजरने बँकेतील रक्कम ह्या ऑनलाईन गेमिंच्या नादातच लुटल्याचं समोर आलं आहे.
एखाद्या सिनेमाला शोभेल असा चोरीचा प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्सच्या कॅनरा बँकेत काल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. चक्क बँकेतील मॅनजरनेच ही चोरी केली असून तब्बल दीड लाख रुपयांची बँकेतील रोकड बँकेच्या सहाय्यक मॅनेजरनेचं लुटल्याची धक्कादायक बाब या घटनेतून समोर आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चिखला मॉइल्स येथील कॅनरा बँकेचे सहाय्यक मॅनेजर मयूर नेपाले (३२) याला अटक केली आहे.
ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचं कर्ज, यासोबत अन्य असं लाखो रुपयांचं कर्ज असल्यानं ते परतफेड करण्यासाठी सहाय्यक मॅनेजरनेच बँक लुटली. या बँके मॅनेजरकडून पोलिसांनी ९६ लाखांची रोकड जप्त केली आहे. यासह या चोरीच्या रकमेसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनासह मोबाईल व अन्य असा १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कॅनरा बँकेत सहाय्यक बँक मॅनेजर असलेल्या मयूर नेपाले याला ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचा छंद होता. यामुळं त्याच्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं. स्वतःच्या अंगावर झालेलं कर्जाचा बोजा यामुळं मयूर नेपाले यांनं स्वतःच्या वडिलांची ८० लाखांची एफडी आणि बँकेतील अन्य दोन ग्राहकांची ३२ लाखांची अशा तीन एफडी तोडून रक्कम उचल केली होती. यासोबतचं मयूरने याच्यावर घेतलेल्या कारचं कर्ज, मित्रमंडळींकडून घेतलेले २० लाखांचे हातउसने कर्ज, शैक्षणिक कर्ज, पेटीएमचं कर्ज असं सुमारे ९० लाखांचं कर्ज त्याच्यावर होतं. बँकेची चावी नेपाले याच्याकडेच असल्याने आणि स्ट्रॉंग रूमची जबाबदारी त्याच्यावरच असल्याने त्याने जाणीवपूर्वक लॉक केलं नव्हतं. पहाटेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने येऊन बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढला. त्यानंतर मोठ्या बॅगमध्ये ही रक्कम भरून दुचाकीनेच तो नागपूरला गेला होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.