मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची उत्तम कामगिरी; रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शहरात बहुतांश ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्त्यांवर कब्जा केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना साधं चालताही येत नसल्याच्या अनेक तक्रारी येतात. आता त्यासंबंधी एक सकारात्मक बातमी आहे. मुंबईतील पहिला रेल्वेवरील पादचारी पूल अनधिकृत फेरीवाले मुक्त करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पूर्व ते अंधेरी पश्चिमला जोडणारा मुख्य पादचारी पूल फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे. या पुलावर दोन्ही बाजूंनी अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकाने उघडले होते. तसेच या पुलावर लहान मुलींचा विनयभंग, छेडछाडीच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा मुख्य पादचारी पूल हा त्याच्या निर्मितीपासून नेहमीच चर्चेत आहे. या पुलावर मोठ्या संख्येने अनधिकृत फेरीवाल्यांनी ताबा मिळवला होता. या पुलावर दोन्ही बाजूंनी अनेक अनधिकृत दुकाने थाटली होती.
अनिधिकृत फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य लोकांना पुलावरुन जाण्यासाठी अगदीच कमी जागा उरली होती. तसेच या पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांकडून सातत्याने महिला, लहान मुलींच्या विनयभंगाच्या, छेडछाडच्या आणि मारहाणीच्या तक्रारींमध्ये वाढ होत होती.या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये सातत्याने तक्रार केली जात होती. आता या तक्रारीची दखल घेत अंधेरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी अंधेरी रेल्वे पादचारी पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हा पूर फेरीवाला मुक्त केला आहे.सध्या अंधेरी पादचारी पुलावर अंधेरी पोलिसांनी दोन स्टाफची नेमणूक केली आहे, त्यासोबत या पुलावर पेट्रोलिंग वाढवली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या या कारवाई सर्वसामान्य नागरिकांकडून अंधेरी पोलिसांवर कौतुक केला जात आहे.
मुंबईला अवैध फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, कांदिवली, बोरीवली, दादरमध्ये तर सर्वसामान्य लोकांना चालायलाही जागा उरलेली नाही. असं असूनही प्रशासन कारवाई करण्यात सतत अपयशी ठरत आहे. बेकायदेशीरपणे व्यवसाय करण्याचा जणू परवानाच फेरीवाल्यांना देण्यात आला अशा पद्धतीची स्थिती सर्व ठिकाणी दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत.