शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! ४६ लाख २० हजारांचे २३१ हरवलेले मोबाईल हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – सोलापूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक तपास कौशल्याचे प्रत्यंतर देत नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यात मोठे यश मिळवले आहे. शहरातून गहाळ झालेल्या विविध कंपनींचे एकूण २३१ हँडसेट, किंमत सुमारे ₹४६ लाख २० हजार, पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या “सीईआयआर (CEIR) पोर्टल” च्या मदतीने हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सध्या देशभर सुरू आहे. या पोर्टलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून, सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष तपास पथकांना विविध जिल्ह्यांत आणि परराज्यात पाठवण्यात आले होते.
सदर पथकांनी काटेकोर तपास करून हरवलेले २३१ मोबाईल हँडसेट शोधून काढले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तांत्रिक विश्लेषणाचा अचूक वापर
तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी सीईआयआर पोर्टलवरील डेटाचा वापर करून मोबाईल ट्रॅकिंगची सखोल तपासणी केली. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणामुळे अनेक मोबाईल परराज्यात मिळाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अश्विनी पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अंमलदार महंमद रफिक इनामदार, संतोष पापडे, एकनाथ उबाळे, शंकर भिसे, समाधान मारकड, संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, खाजप्पा आरेनवरु, दत्ता मोरे, सुधाकर माने आदींनी सहभाग घेतला.
नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन
हरवलेल्या मोबाईलचा शोध जलद व्हावा यासाठी नागरिकांनी ceir.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या मोबाईलची माहिती नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.