“तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा!”; राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला खुले आव्हान
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट खुले आव्हान दिले आहे. “जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाहीत आणि ती पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा,” असे आव्हान त्यांनी मुंबईतील एका मेळाव्यातून दिले.
राज ठाकरे यांनी या वेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार याद्यांतील त्रुटींवर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात खरी आणि पारदर्शक निवडणूक व्हायची असेल तर सर्वप्रथम मतदार यादीतील चुका आणि घोळ दूर केले पाहिजेत. “जो मतदार आहे, त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे त्यालाच मतदान करू द्या. मला कोण सत्तेत येतो, कोण हरतो याचं काही देणंघेणं नाही; पण जे मतदान होईल ते खरं असलं पाहिजे,” असे ठाकरे म्हणाले.
मेळाव्यात मनसे प्रमुखांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदार यादी तपासणीबाबत सविस्तर सूचना दिल्या. “मी ज्या यादी प्रमुखांना बोलावलं आहे, त्यांना सांगतो की घराघरात जा. प्रत्येक परिसरात कोण राहतो, किती जण आहेत, हे तपासा. सामान्य मतदारांनाही मी सांगतो की आमचे कार्यकर्ते किंवा सहयोगी पक्षांचे लोक जेव्हा येतील, तेव्हा त्यांना सहकार्य करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राज ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यभर मतदार यादी स्वच्छतेचा व्यापक अभियान सुरू करण्याचे संकेत दिले. “हे त्यांनी जे शेण खाऊन ठेवलं आहे, ते आता बाहेर येईल,” अशा शब्दांत त्यांनी विद्यमान यंत्रणांवर निशाणा साधला.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.