पूर्व प्रादेशिक विभागांतर्गत पोलिसांचा ‘मुद्देमाल हस्तांतरण’ उपक्रम; ५०० मोबाइल परत मालकांच्या हाती
रवि निषाद / मुंबई
मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पूर्व प्रादेशिक विभागात दिपावलीच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. गहाळ किंवा चोरीस गेलेले सुमारे ५०० मोबाइल फोन पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. या “मुद्देमाल हस्तांतरण” कार्यक्रमात नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य झळकत होते.
हा कार्यक्रम शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी गोवंडी येथील सिटी बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त समीर शेख उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडल ६ अंतर्गत येणाऱ्या चेंबूर, आरसीएफ, चुनाभट्टी, नेहरूनगर, तिलकनगर, शिवाजीनगर, मानखुर्द, देवनार, गोवंडी आणि ट्रांबे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांचे गहाळ किंवा चोरीस गेलेले मोबाइल फोन तांत्रिक आणि मानवी यंत्रणांच्या मदतीने शोधून काढण्यात आले.
या सर्व फोनचा मुद्देमाल संबंधित पोलिस ठाण्यांनी मूळ मालकांना परत करत “दिपावलीपूर्वीची भेट” दिली. कार्यक्रमात परिमंडल ६ मधील तीनही विभागांचे सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच मोबाइल मिसिंग शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांकडून पोलिस दलाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून, हरवलेली संपत्ती परत मिळाल्याने दिपावलीचा आनंद अधिक उजळल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.