कलिन्यातील शिवनगर चाळीत अल्पवयीन मुलीचा खून, पत्नी गंभीर जखमी; आरोपीला बिहारमधून ठोकल्या बेड्या
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – सांताक्रूज (पूर्व) येथील कलिना परिसरातील शिवनगर चाळीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा खून करत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री वाकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी मो. सुलेमान रज्जाक कुजरा (वय ४०) याने संतापाच्या भरात घरातील जड वस्तूने पत्नी नसीमा (वय ३५) आणि मुलगी असगरी (वय १४) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात असगरीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी नसीमा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७०/२५ अंतर्गत कलम १०३(१), १०९(१), ३५२ भा.दं.सं. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर आरोपीने आपला मोबाईल बंद करून फरार झाला होता.
प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत मुंबई गुन्हे शाखेने तातडीने विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी बिहार राज्यातील आपल्या मूळ गावी पळाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारमध्ये सापळा रचून आरोपीला यशस्वीरीत्या अटक केली.
प्राथमिक चौकशीत आरोपीचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) श्री. निशीथ मिश्रा, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, उपआयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. विशाल ठाकूर, आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (डी-पश्चिम विभाग) श्री. प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत गुन्हे शाखेच्या कक्ष ८, ९ आणि १० मधील अधिकारी व कर्मचारी — प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, पोनि विशाल राजे, सपोनि महेंद्र पाटील, मनोजकुमार प्रजापती, राहूल प्रभु, संग्राम पाटील, रोहन बगाडे, तसेच पोउपनि सुजित म्हैसधुने आणि इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
मुंबई पोलिसांच्या तात्काळ आणि समन्वयित प्रयत्नांमुळे फरार आरोपीला बिहारमधून अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.