नाशिक हादरलं! खंडणीच्या वादातून बारमध्ये गोळीबार; भूषण लोंढेसह १२ जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी उशिरा रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. बिअरबारमधील खंडणीच्या वादातून एका तरुणावर थेट गोळी झाडण्यात आली. या घटनेत विजय तिवारी (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही थरारक घटना सातपूर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बिअरबारसमोर उशिरा रात्री घडली. पोलिस ठाण्याच्या नजीकच झालेल्या या गोळीबारामुळे सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जखमी विजय तिवारी याच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आरोप शुभम पाटील उर्फ भुऱ्या याच्यावर आहे, तर प्रिन्स सिंग याने चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी भूषण पाटील, दुर्गेश वाघमारे आणि आकाश उर्फ अभिजित डांगळे या तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. भूषण पाटील याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सातपूर पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीवरून भूषण लोंढे, शुभम पाटील उर्फ भुऱ्या, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित डांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे आणि चार अज्ञातांविरुद्ध खंडणीसाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-२ चे उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगितले.
पोलिस तपासात उघड झाले आहे की, हॉटेलमधील दररोजच्या भांडणांवर तोडगा काढण्यासाठी खंडणीच्या स्वरूपात भागीदारीची मागणी करण्यात येत होती. या वादातूनच भूषण लोंढे याने गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सातपूर परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर अशा बार आणि अड्ड्यांवर कोणाचा वरदहस्त आहे, याची चर्चा पुन्हा रंगली आहे. पोलिसांची कारवाई कागदावरच राहणार की प्रत्यक्षात बदल दिसून येणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.