पोलिसालाच ऑनलाईन गंडा; तब्बल १३ लाखांची फसवणूक, जम्बो लोनही काढले
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर : दररोज नागरिकांना ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत पोलीस वारंवार आवाहन करतात, तरीही फसवणूक थांबण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे यावेळी बदलापूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यालाच तब्बल १३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रमोद कोळी हे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यातून सुमारे ४ लाख २७ हजार रुपयांच्या मुदत ठेवी काढल्या गेल्या, तर त्यांच्या नावाने ८ लाख ९० हजार रुपयांचे जंम्बो लोन मंजूर करून घेतले. या प्रकारामुळे कोळी यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना माहिती देत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या फसवणुकीत कोळी यांचा ई-मेल आयडी हॅक करून त्याऐवजी दुसरा आयडी लिंक करण्यात आला होता. या माध्यमातूनच सर्व घोळ घालण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण फसवणुकीची रक्कम १२ लाख ६९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा मागोवा घेणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.