स्कूल बस’ची डिव्हायडला धडक; चिमुकल्यांची जीवाशी खेळ करणारा मद्यधुंद चालक अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा भाईंदर – मिरा भाईंदरमध्ये चालकाने दारुच्या नशेत शाळेची बस चालवल्याची घटना घडली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बसने डिव्हायडरवरला धडक दिली आहे. या अपघातानंतर बसमधील लहान मुले घाबरुन मोठ्याने रडू लागली. यानंतर पोलिसांनी त्या चालकावर कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी बस देखील जप्त केली आहे. मिरा भाईंदरमधील काशीमीरा वाहतूक विभागाने भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कलवर धडक कारवाई करत माऊंट मेरी स्कूलच्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. हा चालक दारुच्या नशेत बस चालवत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी बस जप्त केली आहे. गुरुवारी सकाळी शाळेची बस चालवताना चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. या बसमध्ये आर.बी. स्कूलचे पाच विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नशेत असलेल्या चालकाने वाहनावरील ताबा गमावला आणि एका ठिकाणी बसला डिव्हायडरवर धडक दिली.
या अपघातानंतर बसमधील लहान मुले घाबरून मोठ्याने रडू लागली. गोल्डन नेस्ट सर्कलवर तैनात ट्रॅफिक पोलिसांनी मुलांचा आक्रोश ऐकून त्वरित बस थांबवली. चालकाची तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी बस जप्त करून चालकावर दंड आकारला. तसेच चालकाला न्यायालयात शुक्रवारी हजर राहण्याचे समन्स देऊन सोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, मुलांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या निष्काळजी बस चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.