आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, १२ जणांना अटक

Spread the love

आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, १२ जणांना अटक

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (कक्ष-२) पथकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत तब्बल १२ आरोपींना अटक केली आहे. कांदिवली (पूर्व) परिसरातील डी.जी. सर्च कन्सलटन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टीक प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

गुप्त माहितीनुसार, या कंपन्यांच्या माध्यमातून देशभरातील सायबर फसवणूक रॅकेटला मदत केली जात होती. आरोपी नवीन बँक खाती, पासबुक, चेकबुक, ई-मेल आयडी व पासवर्ड तसेच सिमकार्ड मिळवून ते अॅक्टिव्हेट करत आणि त्याची विक्री करून फसवणूक रॅकेटला पुरवत होते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

अटक आणि जप्ती

१२ ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत वैभव पटेल, सुनिलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबु संदराजुळा आणि रितेश बांदेकर यांच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ लॅपटॉप, १ प्रिंटर, २५ मोबाईल फोन, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, १ स्वाईप मशीन आणि तब्बल १०४ सिमकार्ड जप्त केले.

बँक डिटेल्सचा काळाबाजार

तपासात उघड झाले की आरोपी हे बँक डिटेल्स ७-८ हजार रुपयांना विकत घेऊन ते अॅक्टिव्हेट करून फसवणूक करणाऱ्यांना पुरवत होते. लॅपटॉपच्या तपासात तब्बल ९४३ बँक खात्यांचा मागोवा लागला असून त्यापैकी १८१ खाती थेट सायबर फसवणुकीसाठी वापरली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

तक्रारी आणि नुकसान

सायबर हेल्पलाईन १९३० वर आलेल्या ३३९ तक्रारींपैकी मुंबईतील १४, महाराष्ट्रातील १२ आणि इतर राज्यांतील ३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या माध्यमातून झालेले आर्थिक नुकसान प्रचंड असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत : ₹१.६७ कोटी

महाराष्ट्रात : ₹१०.५७ कोटी

देशभरात : तब्बल ₹६०.८२ कोटींची फसवणूक

पोलिसांची धडक मोहीम

या प्रकरणी आतापर्यंत १२ आरोपी अटकेत असून, ६७/२०२५ कलम ३१८(४), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिलीप तेजनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम राबवली. सायबर फसवणूक रोखण्यासाठी मुंबई पोलिसांची ही मोठी कामगिरी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon