मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई; पनवेलमधील नाईट रायडर लेडीज बार मनसेने फोडला, तर हल्ला प्रकरणी १५ जणांवर कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल : शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याची ओळख ‘डान्सबार जिल्हा’ अशी होत असल्याची टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पनवेलमधील शेकापच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अनधिकृत डान्सबारांविरोधात रोष व्यक्त केला. या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासांतच पनवेलमधील कोन गावाजवळ असलेल्या नाईट रायडर लेडीज बारवर मध्यरात्री मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत बार फोडला.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाला कलंक ठरणाऱ्या डान्सबार संस्कृतीवर जाहीर निषेध केला होता. “शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला जर डान्सबारमुळे ओळख मिळू लागली, तर ही शोकांतिका आहे,” असे स्पष्ट शब्दांत ठाकरेंनी टीका केली होती. यावेळी त्यांनी प्रशासनाला थेट सवाल केला की, “या ऐतिहासिक जिल्ह्यात डान्सबार सुरू राहतातच कसे?”
या भाषणानंतर अवघ्या १० तासांत, शनिवारी मध्यरात्री १२ वाजता मनसे कार्यकर्त्यांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या नाईट रायडर लेडीज बारवर दांडके आणि काठ्या घेऊन हल्ला केला. हे बार उशिरापर्यंत सुरू असल्याचेही या कारवाईतून उघड झाले. बारच्या आत चालणारी सेवा, महिलांचा सहभाग आणि मोठ्या प्रमाणावर होणारा आर्थिक व्यवहार – या सगळ्यांवर या हल्ल्यातून रोष व्यक्त करण्यात आला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात रायगडमधील शेतकऱ्यांवरील दुहेरी पिळवणुकीचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. “एकीकडे अमराठी बारमालकांकडून जमिनी घेतल्या जातात, तर दुसरीकडे त्या जमिनींवर शेतकऱ्यांनाच पिळलं जातं,” असा आरोप त्यांनी केला. ही भावना मनसे कार्यकर्त्यांनी कृतीत उतरवत, अनधिकृत बार बंद करण्याची मागणी प्रत्यक्ष कृतीतून मांडली.
पनवेल परिसरातील लेडीज बार संस्कृती नविन नाही. २००० च्या दशकात तत्कालीन आमदार विवेक पाटील यांनी हा मुद्दा विधानसभा पातळीवर उपस्थित केला होता. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना संपूर्ण राज्यातले लेडीज बार बंद करण्यात आले होते. मात्र काही वर्षांच्या खंडानंतर, हे बार पुन्हा नव्या स्वरूपात सुरू झाले असून, विशेषतः पनवेल आणि महामार्गालगत त्यांची संख्या वाढलेली आहे.
या भागात कोट्यवधींची उलाढाल होते, तर काही वेळा लेडीज बारमधून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांचे अपघाती मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मात्र स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे.
मनसेच्या या कारवाईनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनधिकृत बार, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी सेवा, आणि त्यामागील संरक्षक यंत्रणा – हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता यावर सरकार आणि पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
डान्सबार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेसह १५ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.