कबूतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल; दादर कबूतरखान्यावर पालिकेची कारवाई, स्थानिकांचा तीव्र विरोध
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य टाकण्यास मनाई करण्यात आली असून, याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम पोलीस ठाण्यात एल. जे. रोडवरील एका अनोळखी चारचाकी वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दादर येथील प्रसिद्ध कबूतर खान्यावर पक्ष्यांना खाद्य टाकल्याच्या तक्रारीवर तीव्र संताप व्यक्त करत, यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, दादर कबूतर खाना परिसरात पालिका अधिकारी आणि पोलीस फौजफाटा सकाळपासूनच तैनात आहेत.
या कारवाईला स्थानिक नागरिक आणि जीवदया प्रेमींकडून मोठा विरोध होत आहे. “कबूतरांना खाद्य न मिळाल्यास ते रस्त्यावर येऊन मृत्युमुखी पडतात,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कबूतर खान्यावर संरक्षक जाळी टाकण्याचे काम पालिकेकडून सुरू असताना, नागरिकांनी रात्रीच्यावेळी झालेल्या या अचानक कारवाईचा तीव्र निषेध केला.
“दादर स्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांवर का कारवाई होत नाही? फक्त कबूतरांवरच कायदा का लागू होतो?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी पालिका आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री ११ वाजल्यानंतर पालिका अधिकारी जाळी टाकण्यासाठी पोहोचले असता, स्थानिकांनी रस्त्यावर उतरून या कारवाईला आक्षेप घेतला. पोलिसांच्या उपस्थितीत नागरिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, कबूतरांसाठी पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी केली.
सध्या दादर कबूतरखाना परिसरात पोलिस बंदोबस्त कायम असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जीवदया आणि कायद्याचे पालन यामधील समतोल साधणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.