शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने ७३ वर्षीय ज्येष्ठाची ५.७७ कोटींची फसवणूक; उल्हासनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : शेअर बाजार आणि आयपीओ मध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. विष्णु कोटवानी (वय ७३) असे फसवणूकग्रस्त नागरिकाचे नाव असून, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीने समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधून ‘बीएसएसएल’ व ‘आरपीएमटीए’ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर या अॅप्सच्या माध्यमातून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले गेले. आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोटवानी यांनी ५ कोटी ७७ लाख २ हजार रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळण्याऐवजी संपर्कच तुटल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी आशिष कुमार, इशिता कपू आणि अद्विक शर्मा या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने पोलीसही हादरले आहेत. दरम्यान, बदलापूरमध्येही अशाच प्रकारे ८ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा उल्हासनगरमधील आठवडाभरातील तिसरा तर बदलापुरातील दुसरा ऑनलाईन फसवणूक प्रकार आहे.
सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, सायबर गुन्हेगार ऑनलाइन संदेश, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना जाळ्यात अडकवत आहेत. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अपरिचित लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.