पनवेल महापालिकेच्या शाळेतील संतापजनक प्रकार;विद्यार्थ्यांना शौचालयात धुवावं लागतंय जेवणाचं ताट
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्रमांक ६, धाकटा खांदा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयाजवळील बेसिनमध्ये स्वतःची ताटे धुवावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शाळेत पनवेल महानगरपालिकेने दोन मावश्या नियुक्त केल्या आहेत. मात्र, या मावश्या ताट धुण्याचे काम करत नसल्याने लहान मुलांनाच आपल्या हाताने ताटे धुवावी लागत आहेत. विशेष म्हणजे ही ताटे शौचालयात लागलेल्या बेसिनमध्ये धुतली जात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ योग्य आहे का? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
या शाळेत केवळ ताट धुण्याचाच प्रश्न नाही, तर मिड डे मील वेळेवर मिळत नसल्याचे आणि मिळणारे अन्न गुणवत्ताहीन असल्याचेदेखील आरोप करण्यात येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अन्न खराब असण्याच्या तक्रारी पालकांकडे केल्या असून, यावर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणावर पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी गप्प का? शाळेतील मूलभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यासारख्या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक का केली, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि सन्मानाची वागणूक मिळायला हवी. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.