ऑनलाइन गेमने घेतला १६ वर्षीय मुलाचा जीव;पैसे हरल्याने उचलले टोकाचे पाऊल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाने फक्त ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात घडली आहे. सम्राट भालेराव (१६) असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो जय भवानी रोड, डायना नगर भागात राहायचा. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. दिवसेंदिवस तो मोबाईलमध्येच गुंतून राहत होता. घरच्यांनी अनेकदा समजावूनही त्याचे मोबाईलचे व्यसन वाढतच गेल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री तो एका ऑनलाइन गेममध्ये पैसे हरला आणि त्यानंतर आलेल्या नैराश्यामुळे त्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती सकाळी मिळाल्यावर घरातील सदस्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सम्राटच्या पश्चात त्याची आई आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे. घरातील एकमेव पुरुष सदस्य असलेल्या सम्राटच्या निधनाने कुटुंब उध्वस्त झाले आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे.