३०० कोटींची महाघोटाळा फसवणूक उघड : ‘दुप्पट पैसे’चं आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदार अडचणीत
पोलीस महानगर नेटवर्क
शिर्डी (अहिल्यानगर) :
एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष आणि मासिक भरघोस परतावा देण्याचे वादग्रस्त वळण घेत एक भयानक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शिर्डी तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात शिर्डी आणि राहाता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी’तर्फे फसवणुकीचे जाळे रचून गुंतवणुकीवर एक वर्षात पैसे दुप्पट आणि महिन्याला भरघोस व्याज दिलं जाईल, असं सांगून सामान्य नागरिकांपासून ते सेवानिवृत्त अधिकारी, साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली गेली. काही गुंतवणूकदारांनी तर कर्ज काढून रक्कम गुंतवली होती.
तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी खोटं नाटं आश्वासन
सावळे आणि त्याच्या टोळीने गुंतवणूकदारांना फसवून तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी मानसिक दबाव आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. “तक्रार केलीत तर परतावा मिळणार नाही,” असा धमकीवजा इशारा देऊन त्यांनी फेब्रुवारी ते जून २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात रकमेची विल्हेवाट लावली. अखेर आर्थिक व्यवहारात अनियमितता जाणवताच काही सतर्क गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली. शिर्डी परिसरातील २१ गुंतवणूकदारांनी पुढाकार घेऊन सावळे आणि त्याचे वडील राजाराम भटू साळवे यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात विविध फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या गुंतवणूकदारांची एकूण फसवणूक रक्कम १ कोटी ६५ लाख रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद आहे.
ही केवळ सुरूवात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे गुंतवणूक गोळा करून फसवणूक केल्याची माहिती हाती येत असून एकूण रकमेचा आकडा ३०० कोटींहून अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सखोल करण्यासाठी शिर्डी पोलिस, नाशिक परिक्षेत्रातील आर्थिक गुन्हे शाखा तसेच इतर यंत्रणा कामाला लागल्या असून, आणखी काही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून गुंतवणूकदारांना पुढे येऊन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फसवणुकीचे प्रकार वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. दुप्पट पैसे, भरघोस परतावा, मासिक व्याज यांसारख्या आकर्षक संकल्पनांमागे लपलेल्या जाळ्यांपासून सावध राहणे आणि योग्य सल्ल्यानंतरच गुंतवणूक करणे हे काळाची गरज आहे.