आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत बनवले व्हिडिओ, आरोपीला अटक, चौकशीतून धक्कादायक खुलासे
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत १४ दिवस बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक केल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने सांगितले की, स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून दाखवण्यासाठी २१ बनावट ईमेल आयडी तयार केले होते. या आयडींचा वापर बेंगळुरू, मंगळुरू आणि हैदराबाद सारख्या वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हिडिओ आणि कंटेंट पोस्ट करण्यासाठी केला होता, जेणेकरून तो सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण करू शकेल आणि पैसे कमवू शकेल.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की बिलाल डिसेंबर २०२४ मध्ये बहरीनला गेला होता आणि त्यापूर्वी दुबईलाही गेला होता. तसेच आयआयटी पवईमध्ये राहत असताना त्याने एका एआय सेमिनारलाही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, बिलाल फक्त १० वी पास आहे आणि त्याने मंगळुरूमधून वेब डिझायनिंगमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा केला आहे. सध्या तो सुरतमधील एका खाजगी कंपनीत काम करतो आणि त्याचे मासिक उत्पन्न १.२५ लाख रुपये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल आयआयटी कॅम्पसमध्ये पीएचडी विद्यार्थी असल्याचे भासवून फिरत असे, तो हॉस्टेलच्या कॉमन रूममध्ये झोपत असे. त्याने कॅम्पसमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले, परंतु आतापर्यंतच्या तपासात त्याने यातील कोणताही मजकूर कोणालाही पाठवला नाही अशी माहिती समोर आली आहे. बिलालच्या वडिलांचे कपड्याचे दुकान आहे आणि त्याचे काही नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतात. त्याच्या तपासात दहशतवादी किंवा संशयास्पद हालचाली दर्शविणारे अद्याप अद्याप काहीही आढळले नाही. गुप्तचर विभाग आणि दहशतवादविरोधी संस्थांनीही त्याची चौकशी केली आहे. मात्र आतापर्यंत कोणतेही गुन्हेगारी पुरावे सापडलेले नाहीत. बिलाल तेली ७ जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या ताब्यात असणार आहे.