डोंबिवली लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, ढकलाढकली व तुंबळ हाणामारी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त येईपर्यंत मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता डोंबिवली स्थानकावरून १ जुलै रोजी सकाळी ८.२० वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची जोरदार हाणामारी झाली. ही घटना स्थानिक महिला डब्यात घडली असून, एकमेकींवर ओरडत, शिवीगाळ करत आणि झिंज्या उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकींना ढकलत असल्याचे दिसते. या व्हिडीओत दोन महिला केस उपटत एकमेकींना बेदम मारत असल्याचे दिसत आहे.
विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवलीमध्ये सकाळी ८.२० वाजता डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दररोजच्या प्रमाणे गर्दीच्या वेळेत महिलांचा लोकल डबा भरलेला असतो. याच गर्दीत जागेवरून वाद झाला असावा, असं प्राथमिक माहितीवरून समजते. पण हा वाद इतका वाढला की थेट हाणामारीपर्यंत गेला. काही महिला प्रवाशांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलांनी कुणाचंच ऐकलं नाही.मुंबई लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या अशा भांडणाच्या घटना आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, तसेच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बॉक्स
लोकल मधील महिलांच्या डब्यातील रेल्वे प्रशासनाला लाज वाटणारं हाणामारीचं दैनंदिन दृश्य – प्रकाश संकपाळ, सचिव- पुणे मुंबई रेल्वे प्रवासी संघ
मुंबई ही केवळ एक महानगर नाही, तर लाखो सामान्य माणसांचे स्वप्न आहे. या स्वप्ननगरीचे हृदय धडधडते ते लोकल रेल्वेमुळे. पण हीच ‘लाईफलाईन’ आज महिला प्रवाशांसाठी ‘दैनंदिन संघर्ष’ बनली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रचंड गर्दी, ढकलाढकली, शिवीगाळ आणि अनेकदा हाणामारीचं भयाण दृश्य दिसतं. अगदी तिकीट काढून, नियमांनुसार प्रवास करणाऱ्या महिलांनाही लोकलमध्ये शिरण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं.
अराजकाला रेल्वे प्रशासनाची उदासीनता जबाबदार
महिला डब्यांची संख्या कमी
त्यांची क्षमता अत्यल्प
फेऱ्यांमध्ये वाढ नाही
आणि स्थानकांवर पोलीस बंदोबस्ताचा अभाव
हे सगळं मिळून महिला प्रवाशांच्या रोजच्या जीवनात त्रासाचा कडवट घोट भरतं आहे.
एक डबा – हजार स्वप्नांचा गोंधळ
लोकलमध्ये बसणं दूरच, उभं राहणंसुद्धा दुरापास्त. आई, बहिण, पत्नी, मुलगी, विद्यार्थिनी, प्रत्येकजणी सकाळी स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजत असते. केवळ जागा मिळवण्यासाठी हातपाय झाडावे लागतात, एकमेकींवर ओरडावं लागतं. हे दृश्य समाजाच्या आणि प्रशासनाच्या अपयशाचं दर्शन घडवतं.
तिकीट काढूनही अपमानित का व्हावं?
रेल्वेचं तिकीट म्हणजे प्रवासाचा हक्क. पण तो हक्क महिला प्रवाशांना मिळतो का? नाही.
दोनशे महिलांसाठी राखीव केलेला डबा, आणि तिथे चढणाऱ्या पाचशे महिला. ही स्थिती केवळ त्रासदायक नाही, तर अपमानकारक आहे.
उपाय काय?
१. महिला डब्यांची संख्या वाढवणं
२. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात अधिक गाड्या सोडणं
३. डिजिटल आरक्षण प्रणालीचा विचार
४. स्थानकांवर महिलांसाठी वेगळ्या रांगा, सुरक्षा व्यवस्था
५. नियमित तपासण्या व प्रवाशांच्या तक्रारींना प्राधान्य
हे प्रश्न केवळ महिला प्रवाशांचे नाहीत, तर मुंबईच्या न्याय व सुरक्षिततेच्या मूलभूत प्रश्नांपैकी एक आहे. तिकीट काढूनही जर प्रवास ‘युद्ध’ वाटत असेल, तर ती लोकशाहीची लाज आहे.
रेल्वे प्रशासनाने डोळे उघडावे, आणि महिला प्रवाशांची ही दैनंदिनी थांबवावी – हीच वेळेची गरज आहे.