“रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे कॅप्टन; फडणवीसांचे विश्वासू, संघाच्या मनाचा माणूस”

Spread the love

“रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे कॅप्टन; फडणवीसांचे विश्वासू, संघाच्या मनाचा माणूस”

डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठी नव्या संघटनात्मक नेतृत्वाची निवड केली असून, डोंबिवलीचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण हे भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र विरोधकांसाठी ते “तेरावे” ठरतील, असा शब्दप्रयोग मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यंगात्मक शैलीत केला. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण विरोधकांचे बारा वाजवतीलच!”

चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विश्वासू समजले जातात. त्यांचे संघटन कौशल्य, संघाशी असलेली नाळ, आणि शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे त्यांना पक्षांतर्गत आणि संघाकडूनही पसंती मिळाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे निष्ठावान अनुयायी म्हणून त्यांची ओळख असून, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे.

राज्याच्या राजकारणात गेली दोन दशके त्यांची मजबूत उपस्थिती असून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, अशा अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असून, सध्या ते पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत.

रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास:

२०९२ : भाजयुमो (युवा मोर्चा) कल्याण उपजिल्हाध्यक्ष

२००५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक

२००७ : स्थायी समितीचे सभापती

२००९ ते २०२४ : सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार

२०१६ ते २०१९ : राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, चार खात्यांची जबाबदारी

२०२० : भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री

२०२२ : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

२०२४ : भाजप प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती

त्यांच्या कार्यकाळात ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे उपक्रम विशेष गाजले. मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी त्यांनी सक्रिय सहकार्य केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त, संघनिष्ठ कार्यकर्ते, आणि पक्षनिष्ठा यामुळेच त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

भाजपसाठी मोठं आव्हान म्हणजे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचं नेतृत्व किती प्रभावी ठरतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon