१७.७५ कोटी खर्चून बांधलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील स्लॅबचा प्लास्टर कोसळला; शिक्षक व विद्यार्थी थोडक्यात बचावले
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नेरुळ सेक्टर ३० येथील महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीतील वर्गात शिकवणाऱ्या शिक्षिकेवर स्लॅबचा प्लास्टर कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. अंदाजे १७.७५ कोटी रुपये खर्चून उभारलेली ही शाळा अवघ्या काही दिवसांतच धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले असून, बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेचे शैक्षणिक वर्ष १६ जूनला सुरू झाले होते. त्यानंतर चौथ्याच दिवशी, इयत्ता ६वी ‘क’ वर्ग सुरू असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर वर्गात कोसळला. यावेळी वर्गात ३६ विद्यार्थी उपस्थित होते. वर्गशिक्षिकेच्या डोक्यावर प्लास्टरचा काही भाग कोसळून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
दर्जाहीन बांधकामाची गंभीर स्थिती
या नव्या इमारतीत इयत्ता आठवी ते नववीचे वर्ग सुरू आहेत, पण इमारतीला अनेक ठिकाणी तडे, पाण्याच्या गळती, आणि अस्थिर रचना आढळून आली आहे.मुख्य बीमला तडे पडले असून, तिथून पाणी सतत गळत आहे. प्लास्टिकची पाण्याची टाकी गच्चीवरून खाली पडल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेतील काही वर्गांमध्ये पाणी जमा होत आहे. ही स्थिती पाहता बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होते. या इमारतीत आजही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शौचालयांबाहेर कोणतेही सूचनाफलक अथवा मार्गदर्शक चिन्ह लावलेले नाहीत. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
या घटनेनंतर शिवसेना (उबाठा गट)चे उपशहर अध्यक्ष समीर बागवान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी जबाबदारी आहे. संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याला तात्काळ काळ्या यादीत टाकावे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.