६० वर्षीय वृद्धाचा शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी आरोपीला चोप देत केले पोलीसांच्या स्वाधीन
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. ६० वर्षीय वृद्धाने शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत धावत्या बाईकवरुन उडी मारली आणि तिची सुटका झाली. अलिम आयुब कर्जिकर असे आरोपी वृद्धाचे नाव आहे. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून चालत्या दुचाकीवरुन उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे. या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातील रोहा परिसरात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर मुलगी रोहा एस.टी. स्टॅण्ड परिसरात उभी होती. त्यावेळी अलिम कर्जिकरने “तुला घरी सोडतो” असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवले. चनेरा स्टॉपवर सोडण्याचे आश्वासन देत तो तिला घेऊन निघाला.प्रवासादरम्यान त्याने मुलीला चॉकलेट दिले, ज्यामुळे तिला संशय आला व तिने स्वतःच्या बचावासाठी चालत्या दुचाकीवरून उडी मारून आरडाओरड केला. स्थानिकांनी तातडीने धाव घेत अलिमला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलिम कर्जिकर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहे.