ती खुनी किंवा दहशतवादी नाही, पूजा खेडकरला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयचा पोलिसांवर संताप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामिनासाठीची विनंती मंजूर करण्यात आली आहे. युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्गाचा वापर केल्याचा पूजा खेडकर हिच्यावर आरोप आहे. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या जामिनावरील अर्जाची सुनावणी झाली. यावेळी पूजा खेडकरला जामीन मंजूर करत असल्याचा आदेश या खंडपीठाने दिला. खंडपीठाने पूजाने पोलीस तपासात सहकार्य करावे असे निर्देशही दिले आहेत. पूजा खेडकरला जामीन देत असताना सर्वोच्च न्यायालय दिल्ली पोलिसांवर संतापल्याचे दिसले होते. पूजा खेडकर हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जाला दिल्ली पोलिसांनी कडाडून विरोध केला होता.पूजा खेडकरविरोधात आरोप गंभीर स्वरूपाचे असून ती तपासामध्ये अजिबात सहकार्य करत नसल्याचे म्हणत दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी पूजाच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध केला होता. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, ” तिने असा कोणता मोठा गुन्हा केला आहे, ती ड्रगमाफिया नाही अथवा दहशतवादी देखील नाही. तिने कोणाचा खूनही केलेला नाही. तुमच्याकडे यंत्रणा आहेत, सॉफ्टवेअर आहेत. तुम्ही तुमचा तपास पूर्ण करा. तिने सर्वस्व गमावलं आहे आणि आता तिला कुठे नोकरीही मिळणार नाहीये.
सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तिथे तो फेटाळण्यात आल्याने तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर बोलतान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, “प्रस्तुत प्रकरणाकडे नजर टाकल्यास, तथ्ये आणि घटना लक्षात घेतल्यास अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाला कोणतीही हरकत नव्हती. ”
पूजा खेडकर हिच्यावर लांड्यालबाड्या २०२२ सालची केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पास केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरने तिच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. UPSC ने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आयोगाने पूजाच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. दिल्ली पोलिसांनीही पूजाच्या विरोधात इतर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.