मुख्याधापिकेने विद्यार्थ्याच्या मदतीने पतीला संपवत मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे क्राईम मिस्ट्रीचा उलगडा.

Spread the love

मुख्याधापिकेने विद्यार्थ्याच्या मदतीने पतीला संपवत मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे क्राईम मिस्ट्रीचा उलगडा.

योगेश पांडे – वार्ताहर 

यवतमाळ – यवतमाळमधील चौसाळा जंगलात १५ मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचं गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं आहे. पोलिस तपासात धक्कादायकउलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख (३२) यांचा तो मृतदेह असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शंतनू १३ मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होता. तो सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी (२३) ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच आढळून आले होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली.

पहिल्यांदा आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय आधिक बळावला. तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला आहे. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते. मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक १३ मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. १८ मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon