वयाच्या १७ व्या वर्षी कुटुंबातील चौघांची हत्या; नंतर २३ व्या वर्षी मित्राची गळा आवळून हत्या

Spread the love

वयाच्या १७ व्या वर्षी कुटुंबातील चौघांची हत्या; नंतर २३ व्या वर्षी मित्राची गळा आवळून हत्या

५ जणांची हत्या करून तब्बल २३ वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा २ च्या पथकाकडून नाट्यमय अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई– ५ जणांची हत्या करून तब्बल २३ वर्ष दोन राज्यातील पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा २ च्या पथकाने केली आहे. निरंजन उर्फ राजू शुक्ला असे या आरोपीचे नाव आहे. त्याने मागील २३ वर्षांत ५ जणांच्या हत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे तो एकदाही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. २००२ मध्ये त्याने पश्चिम बंगाल येथे आई आणि तीन भावंडांची तर २००८ मध्ये वसईत मित्राची हत्या केली होती. वसईत २००८ मध्ये वालील येथे राहणार्‍या मनोज साह (२५) याची हत्या झाली होती. किरकोळ वादातून मनोज साहच्या मित्र राजू शुक्ला याने ही हत्या केली होती. मात्र तेव्हापासून तो फरार होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा-२ च्या पथकाने हाती घेतला होता. शुक्ला हा गुजरात मध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली.मात्र तो तेथूनही फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांचे पथक बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील छपरा तालुक्यातील त्याच्या मुळ गावी गेले. पारपत्र पडताळणीसाठी आल्याचे सांगून पोलिसांनी त्याच्या निकटवर्तींयांकडून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावरून तो कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली. बंगळूर शहरात तो कुटुंबियासमवेत रहात होता. तेथे पोलिसांनी त्याला एका इमारीतच्या प्लंबिंगचे काम करायचे असल्याचे सांगून बालावून सापळा लावला आणि आणि अटक केली. मनोज साह याच्या हत्याप्रकरणात १७ वर्षांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

राजू शुक्ला याच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. राजू शुक्ला याचे मूळ नाव निरंजन शुक्ला होते. तो पश्चिम बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्याती हल्दिया गावात वडील, सावत्र आई, आणि तीन सावत्र भावंडासह रहात होता. मात्र त्याची सावत्र आई नीट वागणूक देत नव्हती. त्यामुळे त्याने २६ फेब्रुवारी २००२ रोजी त्याने सावत्र आई गीताकुमारी शुक्ला, लहान बहिण पुजाकुमारी (७), प्रियाकुमारी आणि भाऊ मान (२) अशा चौघांची हत्याराने वार करून आणि गळा दाबून हत्या केली होती.त्यावेळी तो अवघ्या १७ वर्षांचा होता. पश्चिम बंगाल येथून कुटुंबातील चौघांची हत्या करून तो वसईत रहायला आला. तेथे त्याने राजू शुक्ला हे नाव धारण केले. वसईत तो किरकोळ काम करत होता. २७ मार्च २००८ रोजी त्याने किरकोळ वादातून वसई पूर्वेच्या वालीव येथील नाईकपाडा मध्ये कंपनीतील सहकारी मनोज सहा याची डोके भींतीवर आपटून आणि दोरीने गळा आवळून हत्या केली होती. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ (गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहीरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, मुकेश पवार, सचिन पाटील, प्रुफल्ल पाटील, चंदन मोरे, राजाराम काळे, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, पोलीस अंमलदार, अकील सुतार, राहुल कर्पे, अनिल सावळे, अजित मैड, प्रतीक गोडके, राजकुमार गायकवाड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून या आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon