अजित दादांच्या आमदाराने वाटले हत्तीवरून १२५ किलो पेढे; थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

अजित दादांच्या आमदाराने वाटले हत्तीवरून १२५ किलो पेढे; थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – नवनिर्वाचित आमदार काय करतील याचा भरवसा राहिलेला नाही. स्टंटबाजी करण्यासाठी ते काहीही करू शकतात अशीच घटना पुण्यात घडली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर २ महिने उलटल्यादेखील काही नवनिर्वाचित आमदारांचा उत्साह अद्याप कमी झाल्याचं दिसत नाही. दशकांत दशकांची काँग्रेसची भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातील सत्ता उलटवून लावल्यानंतर अजित पवारांचे शिलेदार असलेले नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर अद्यापही विजय जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. मात्र हा जल्लोष आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. मांडेकर हे आमदार झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पिरंगुट मध्ये मांडेकरांची हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि विजयाचा आनंद म्हणून हत्तीवरून १२५ किलो पेढे देखील वाटण्यात आले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाल्या नंतर वनविभाग ॲक्शन मोडमध्ये येत कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटल्या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन म्हणून शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. हत्तीवर मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे. त्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जीथे आहे त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे. मिरवणुकीबाबत मांडेकर यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट केली आहे. यात मांडेकर म्हणाले, उरवडे – आंबेगाव – बोतरवाडी – मारणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हत्तीवरून मिरवणूक काढत व्यक्त केले प्रेम. भोर – राजगड – मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी, चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय – बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असेही मांडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon