पालघर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट, सख्खा भाऊच निघाला मुख्य आरोपी
योगेश पांडे/वार्ताहर
पालघर – पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील १० दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यामुळे धोडी यांचा अपहरण किंवा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. पोलीस आता अविनाश धोडीचा शोध घेत आहे.अशात आता अविनाश धोडीच हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक खुलासा धोडी कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी अशोक धोडींचे भाऊ अविनाश धोडी हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. तर अविनाश धोडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करतानाच अशोक धोडी यांचा मुलगा आकाश याने आरोपी अविनाश धोडी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या या आरोपानंतर अशोक धोंडी यांच्या अपहरणात सख्खा भाऊच मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट होतं आहे.
दरम्यान या प्रकरणात आता आठ पथक विविध ठिकाणी तैनात करून तपास सूरू केला होता. यामध्ये ४ जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण घोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता. पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला होता. त्यानंतर आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सूरू आहे.