महायुतीमध्ये ठाण्यात काहीतरी वेगळं घडतंय? भाजपचा शिंदेंना ठाण्यातून घेरण्याचा प्रयत्न ?
गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याच्या घोषणेनंतर महायुतीत मिठाचा खडा ?
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आता ठाण्यातून घेरण्याची तयारी केली आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. “मी जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतन येथे जनता दरबार घेणार आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्येही जनता दरबार भरवणार”, अशी घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे. गणेश नाईक हे याआधी ३ वेळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. दरम्यान, गणेश नाईक यांच्या ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी इशारा दिला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडेल, असं कुणीही वागू नये. तसेच आमचेदेखील मंत्री पालघरमध्ये जावून जनता दरबार घेतील, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. गणेश नाईक हे मंत्री आहेत. त्यांनी काय करावं हे काही मी सांगू शकत नाही. तो त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. महायुती आहे. आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महायुती म्हणून लढलेल्या आहेत. ते ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर उद्या पालघरमध्ये आमचे काही मंत्री जनता दरबार घेतील. महायुतीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये”, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
गणेश नाईक यांच्या ठाण्यात जनता दरबार भरवण्याच्या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सीनियर आहेत. गणेश नाईक शिवसेनेत असताना सुद्धा मंत्रिमंडळात होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे कुठेच नव्हते. राजकीय दृष्ट्या, गणेश नाईक आज कोणत्या पक्षात आहेत हा विचार सोडा. पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव आणि आवाका मोठा आहे. एक मंत्री म्हणून त्यांना आपापल्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात लोकांचे प्रश्न सोडवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच चुकीचं असं काही नाही. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत फिरावं. तेही मंत्री आहेत. तिथेही महानगर पालिका आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “कोणताही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार घेऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही पक्षातील मंत्रिमंडळातील सदस्यांनीदेखील राज्यामध्ये जावून जनता दरबार घेतला पाहिजे. आमचे सर्व मंत्री जनता दरबार घ्यायला लागले तर जनतेचं भलंच होईल. त्यामुळे ही सर्वांनाच मुभा आहे. मंत्री या राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे कुणाला नाही. कुणीही कुठेही जावून जनता दरबार घेऊ शकतो”, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.