पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
चाकूच्या धाकाने लुटणारी टोळी गजाआड; तपासात महाराष्ट्रासह बुलंदशहर, उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये गुन्हे केल्याचे उघड
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली, बिहार तसेच उत्तर प्रदेशात गुन्हेगारी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना टोळी चाकूच्या धाकाने लुटत होती. राजगड पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेची तब्बल १४७ एटीएम कार्ड, पन्नास हजारांची रोकड जप्त केली. त्यांचा १ साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. समून रमजान (३६), नसरुद्दीन नन्ने खान (३०) आणि बादशाह इस्लाम खान (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आदील सगीर खान (३०) असे फरार झालेल्या साथीदाराचे नाव आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पथकाने केली.
अटक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संशयीत सोनेरी रंगाची आणि दिल्ली पासिंग असलेली एक कार खेड शिवापूर मार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानूसार पथकाने खेड शिवापूर भागात सापळा रचून गाडी अडविली. त्यांच्याकडे चौकशी करीत असताना एकजण पसार झाला. नंतर पोलिसांनी उर्वरीत तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता गाडीत तब्बल १४७ एटीएम कार्ड मिळून आले. तसेच पन्नास हजारांची रोकड देखील होती. त्यांच्याकडील तपासात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यादरम्यान भोर तालुक्यातील कोळवडे भागातील रहीवासी असलेल्या एकाने आपली लुटमार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. शुक्रवारी खेड शिवापूर भागातील कोंढणपूर येथे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिघांनी चाकूच्या धाकाने लुटले. एटीएम घेवून आरोपींनी पन्नास हजार रुपये काढून चारचाकीतून पळ काढल्याचे या व्यक्तीने सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्यांना आरोपींची गाडी दाखविली असता त्यांनी ती ओळखली. त्यानूसार पोलिसांनी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांनी पुण्यासह जिल्ह्यात आणखी कुठे गुन्हे केलेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. तिघेही सराईत असून, त्यांनी महाराष्ट्रासह बुलंदशहर, उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांनी संगणमताने हे गुन्हे केले आहेत. त्यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.