बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे; सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर…….
सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला प्रकरणानंतर विरोधी पक्षांकडून सरकारवर टिकास्त्र
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच काँग्रेसनेही मागील काही कालावधीमध्ये मुंबईसहीत राज्यभरात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत कायदा-सुव्यवस्थेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजित पवारांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दीकींची हत्या, सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार याचबरोबर बीड, परभणीमधील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन यासंदर्भात भाष्य केलं आहे. “सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. ही घटना मागील काही दिवसांपासून घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारानंतरची आहे. पूर्वीच्या या हल्ल्यांमध्ये मुंबईमधील मोठ्या नावांना मुद्दाम लक्ष्य करण्यात आलं आहे,” असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी प्रशासनाबरोबरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला,” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. “हे सारं वांद्र्यात घडलं आहे जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे,” असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलं आहे. “मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे?” असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला आहे.
तसेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. “सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. ज्यांच्याकडे सुरक्षा आहे ते देखील सुरक्षित नाहीत. तर सर्वसामान्यांचाने काय?” असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. “सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाला, बाबा सिद्दीकींची हत्या, आता सैफ अली खानवर हल्ला झाला. जे जे हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार झाला. बीड, परभणीतही काय सुरु आहे आपण बघत आहोत. हे चाललंय तरी काय?” असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. “मुंबईचे पोलिस हे स्कॉटलँडच्या तुलनेचे होते मग मुंबई पोलिसांची अवस्था अशी का झाली? त्यांना स्वातंत्र्य नाही. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. त्यांच्या बायकांबद्दल बोलले जाते. गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल. पोलिस आयुक्त व संचालक कुठे आहेत? हे यंत्रणेचे अपयश आहे,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच, “वर्दळीच्या वस्तीतदेखील अशा घटना होत आहेत. ज्यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था आहे त्यांची अशी अवस्था आहे तर सर्वसामान्यांचे काय? लोकांना बंदुकी, चाकू या वस्तू कुठून मिळू लागल्या आहेत? लोक घरात सुरक्षित नाहीत. आता तर लोक घरात घुसायला लागलेत. पोलिसांचे वर्चस्व कमी झाले आहे. पोलिसांचा दरारा कमी झाला आहे,” असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. “मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवू शकत नाही. कायदा सुव्यवस्थाबद्दल चर्चा होते पण कारवाई कुठे होते? पोलिसांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. पोलिस यंत्रणेचे खच्चीकरण थांबवले पाहिजे. गृहमंत्रालयाने आता बोललं पाहिजे,” अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.