ऑनलाइन जुगार खेळून लोकांची उधारी-उसनवारी देण्यासाठी भावाची बहीणीच्या घरामध्ये चोरी; एक लाख ३७ हजार रुपयांचे दागिने केले हस्तगत
योगेश पांडे/वार्ताहर
पिंपरी – पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम (डिलिव्हरी बॉय) करणाऱ्या तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख ३७ हजार रुपयांचे १२५ ग्रॅम दागिने हस्तगत केले. श्रीकांत दशरत पांगरे (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका हौसिंग सोसायटीत १३ जानेवारी रोजी दुपारी घरफोडी झाली होती. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घराचा मागील दरवाजा, लोखंडी कपाटाची कोणत्याही प्रकारची तोडफोड झाली नसल्याचे आणि दरवाजाची आतील कडी बाहेरुन हात घालून उघडणे शक्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. चोरी घरातीलच कोणीतरी केल्याचा पोलिसांना संशय आला. कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली असता फिर्यादी औषधाचे दुकान चालवतात तर पती नोकरीसाठी दिवसा बाहेर असतात हे समजले. फिर्यादीचा सख्खा भाऊ श्रीकांत हा गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे राहण्यास आला. घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम करतो. पोलिसांनी श्रीकांतबाबत माहिती घेतली. त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून जुगारात हारल्याची माहिती मिळाली. त्यामुळे श्रीकांतवर संशय बळावला. श्रीकांत मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जुगारात हारलेली रक्कम ऑनलाइन जुगार खेळून लोकांची उधारी-उसनवारी देण्यासाठी बहीणीच्या घरामध्ये चोरी केल्याची कबुली त्याने दिली. घराचा मागील दरवाजा उघडा ठेवून घरी कोणी नसताना कपाटातील १२५ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले. संशय येवू नये म्हणून बहिणीसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचेही श्रीकांत याने चौकशीत सांगितले.