सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या गुजरातच्या बंटी – बबलीच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – सराफांच्या दुकानात प्रवेश करून हातचलाकीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या बहीण-भावाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे साडेसहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. अहमदाबाद येथील चंद्रकांत विनोदभाई परमार – ५५ व त्याची बहीण पूनम कमलेश शर्मा – ५७ या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १७ डिसेंबर २०२४ रोजी नाशिकरोड येथील पु. ना. गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात साडेतीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या हातचलाखी करून नेल्याबावत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. त्यावेळी गाडगीळ अँड सन्स यांच्या नाशिक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना फोनद्वारे कळवले की, नाशिकरोड शाखेमध्ये ज्या ज्येष्ठ बंटी बबलीने दागिने चोरले होते. त्या वर्णनाचे दोन्ही नाशिक शाखेत आले आहे.
पोलीस निरीक्षक सपकाळ यांनी तात्काळ पथक पाठवून चंद्रकांत परमार व त्याची बहीण पूनम शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी नाशिकरोड येथील पु. ना. गाडगीळ यांच्या दुकानात झालेल्या चोरीची कबुली दिली. त्यांना विश्वासात घेऊन आणखीन माहिती विचारली असता त्यांनी यापूर्वी सोलापूर येथील बाजार पोलीस ठाणे व पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाणे येथे याच पद्धतीच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच लाख, तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. नाशिकमधील २७ ग्रॅम तर, पुणे आणि सोलापूर येथील १७ आणि २१ ग्रॅम सोने नाशिक पोलिसांनी जप्त केले आहे. या बहीण-भावावर गुजरातमध्ये कर्ज झाल्यामुळे त्यांनी हा फंडा वापरल्याचे सांगितले.