घरे फोडणाऱ्या एका व्यसनाधीन सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ लाखांचा ऐवज जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – व्यसनाधीन तसेच बंद घरे फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याने एका बड्या हस्तीचा बंद फ्लॅट फोडत लाखोंवर डल्ला मारला होता. त्याच्याकडून सोन्याचे दागिने तसेच एक दुचाकी असा तब्बल ८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. आर्यन अजय माने – २० असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून वानवडी तसेच बंडगार्डनमधील प्रत्येकी एक असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, प्रकाश आव्हाड, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, प्रदिप शितोळे यांच्या पथकाने केली आहे.
शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी तर घेतली जात आहेच पण, सराईतांचा माग देखील काढला जात आहे. दरम्यान, कॅम्प भागातील एका बड्या व्यक्तीचा फ्लॅट फोडून १५ लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलिसांच्या पथकाचे उपनिरीक्षक स्वप्निल लोहार व त्यांचे पथक करत होते. यादरम्यान कर्मचारी प्रदिप शितोळे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांना माहिती मिळाली की, इस्कॉन मंदिर परिसरात संशयित थांबला आहे. त्यानूसार, पथकाने सापळा रचून आर्यन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे परकीय चलन मिळाले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या १५ लाखांपैकी ८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी देखील जप्त केली आहे.