मुंबईत पाण्याची टाकी फुटून ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिघेजण जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिद्धार्थ नगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू झाले होते. जिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
९ वर्षांची मुलगी खुशी शहा टाकीजवळ खेळत होती, तर इतर तीन लोक बसले होते. अपघातग्रस्त खुशीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनाज शाह (१०), गुलाम मुल्ला (३२) आणि नजराना अली हुसैन (३५) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.