स्वत:च्याच डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोनं गायब केल्याचा बनाव करणाऱ्या लातूरच्या सराफा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
लातूर – स्वत:च्याच डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याचे दागिने लुटीचा बनाव लातूरच्या सराफा व्यापाऱ्याने केला आहे. याप्रकरणी सराफा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लातूरचे सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके राहणार पोचम्मा गल्ली, लातूर यांनी लातूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली होती. लातूरच्या दुकानातून आपण २० लाख ४६ हजार किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने स्कुटी गाडीच्या डिक्कीमध्ये घेऊन गिऱ्हाईकांना दाखवण्यासाठी रेनापूरला गेलो होते. तिकडून परत येत असताना संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेनापूरहून लातूरला परत येत असताना कातळे नगर जवळ मोटर सायकलवरून दोन जण आले, या दोघांनी माझ्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसंच २६ तोळे सोन्याचे दागिने घेऊन ते पळाले, अशी तक्रार केली.
सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण बि. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात तपासाला सुरूवात झाली. पोलिसांचं पथक सराफा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून घटनास्थळी रवाना झालं. घडलेली घटना आणि अमर साळुंके सांगत असलेल्या हकीकत मध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती दिसून येत होत्या, त्यावरून पथकाने अमर साळुंके यांची पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी चोरीचा बनाव केल्याचं कबूल केलं. चोरीला गेल्याचा बनाव करून आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आपण हे केल्याचं सराफा व्यापाऱ्याने सांगितलं. हे दागिने रेणापूरहून लातूरकडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतात खड्डा करून लपवून ठेवल्याचं अमर साळुंके याने सांगितलं, त्यानंतर पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले. याप्रकरणी पोलिसांनी खोटी तक्रार दिल्यावरून अमर अंबादास साळुंके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.