पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची ४ वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता भरधाव कारने तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार पाषाण येथील ननावरे चौक आणि परिसरात घडला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यावेळी संतापलेल्या स्थानिकांनी धडक देणाऱ्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. पाषाण येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. ननावरे चौकात सर्वप्रथम कारचालकाने एका वाहनाला धडक दिली. तेथे स्थानिक नागरिकांनी कारचालकाला घेरले आणि कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, कारचालकाने तेथून पळ काढला. त्याचा राग आल्याने काही तरुणांनी कारवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात त्या कारच्या काचाही फुटल्या. तसेच, पळून जाण्याच्या प्रयत्नात कारचालकाने काही अंतरावर आणखी तीन वाहनांना धडक दिली. यात संबंधित कारही रस्त्यावर उलटली. तेथे कारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.