धक्कादायक ! १३ वर्षांच्या मुलावर तब्बल ७ महिने लैंगिक अत्याचार; मुलंड पोलिसांकडून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – बदलापूरमधील एका नामवंत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आणि राज्यभरात प्रचंड खळबळ माजली. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे किळसवाणं कृत्य केल्याचे उघड झाले आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यावरून विरोधकांनी राज्यभरात आंदोलनं करत सरकारलाही धारेवर धरलं. मुलींच्या सुरक्षिततेवरून राज्यात रान पेटलेलं असतानाच आता मुलुंडमध्येही असाच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मुलुंडमध्ये एका १३ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून ५० वर्षांच्या नराधम इसमाने हे लाजिरवाणे कृत्य केलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या ७ महिन्यांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. आरोपी इसम त्या पीडित मुलावर गेल्या ७ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. तो त्या मुलाला घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात घेऊन जायचा आणि तेथे त्याचे शोषण करायचा. एवढंच नव्हे तर या घटनेबद्दल घरात किंवा बाहेरही इतर कोणालाही काहीही सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकीही त्या नराधमाने दिली होती. अखेर आता हा प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलाने, कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी ताबडतोब मुलंड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.