नालासोपारामध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार; तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपाऱ्यातील संतोष भवन भागामध्ये ३२ वर्षीय पीडित महिलेचं आरोपींनी पाठीमागून तोंड दाबलं, तसंच तिचे केस पकडले आणि तिला उचलून एका रूममध्ये डांबून ठेवलं. यानंतर दोन नराधमांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकारानंतर नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपाऱ्यात राहणारी ३२ वर्षीय पीडित महिला ही १० सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला बोलवण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे आरोपी जितेंद्र यादव उर्फ काटु हा आला. त्याने महिलेच्या डोक्याचे केस पकडले आणि एका हाताने तोंड दाबलं. यानंतर त्याने महिलेला एका गल्लीतून खेचत रूममध्ये नेलं. जितेंद्र आणि दुसरा आरोपी अवी जैसवाल उर्फ बिल्लूने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दोघांनी पीडित महिलेला दिली. यानंतर महिलेने तुळींज पोलीस स्टेशन गाठलं आणि दोन आरोपींविरोधात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी लगेच तक्रार दाखल केली. पीडित महिलेचे आरोपींसोबत काहीतरी वाद असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.