तीन वर्षांपूर्वीचं प्रकरण, ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर तीन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील संशयित आरोपी अंकुश शेवाळे याने पोलिसांवरच आरोप केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने नाशिकचे पोलिस आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचे नाव घेण्यासाठी दबाब आणत असल्याचे सांगितले.
गोळीबार प्रकरणातील ताब्यात घेतलेला संशयित आरोपी अंकुश शेवाळेची आज नाशिक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप अंकुश शेवाळेनी केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याचे नाव घेण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचे शेवाळेनी म्हटले आहे. सुधाकर बडगुजर हे अंकुश शेवाळे याला भेटण्यासाठी गेले असताना सुधाकर बडगुजर यांना आरोपीने हकीगत सांगितली.
अंबड पोलिसांच्या कामकाजावर संशय : सुधाकर बडगुजर
मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर म्हणाले की, पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेतलेल्यांना मारहाण करण्यात येत होती. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. जुने नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आम्हाला त्रास देण्याचे काम केले. पवननगर येथे झालेल्या गोळीबारात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड पोलिसांच्या कामकाजावर मला संशय वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली