अमूल, गोकुळ, महानंद या कंपन्यांच्या २८५ लीटर भेसळयुक्त दूध जप्त; दोघांविराेधात कारवाई
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – गणेशोत्सवानिमित्त दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच याप्रकरणी दोघांविराेधात कारवाई करण्यात आली. देशभरात सप्टेंबर – डिसेंबरदरम्यान विविध उत्सव साजरे करण्यात येतात. या कालावधीत दूध, दूग्धजन्य पदार्थ, मिठाई, मावा, खवा आदी पदार्थांना मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अधिक नफा कमावण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. अन्न आणि औषध प्रशासनाने अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतेच मुंबईतील मालाड येथील दोन दूध विक्रेत्यांवर छापा घातला. या छाप्यामध्ये अमूल, गोकुळ, महानंद या दूध कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे आढळून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७ हजार २२२ रुपये किमतीचे १२२ लिटर दूध जप्त करण्यात आले. तर श्रीनिवासुलू रामस्वामी बंडारू – ५२ यांच्याकडून ९ हजार ८०६ रुपयांचे १६३ लिटर दूध जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दुधाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून उर्वरित दूध नष्ट करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनाचे मुंबई विभागातील अन्न निरीक्षक ए. व्ही. कांडेलकर आणि ठाणे विभागातील पी. एस. पवार यांनी सहाय्यक आयुक्त डी. एस. महाले आणि सहआयुक्त एम. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक १२ ची मदत घेण्यात आल्याची माहिती एम. एन. चौधरी यांनी दिली.