गटार आणि काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीच्या कामासाठी लाच स्वीकारणारा कल्याण-डोंबिवली पालिकेचा कनिष्ठ अभियंता निलंबित

Spread the love

गटार आणि काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीच्या कामासाठी लाच स्वीकारणारा कल्याण-डोंबिवली पालिकेचा कनिष्ठ अभियंता निलंबित

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात लाच स्वीकारणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाचा कनिष्ठ अभियता तथा प्रयोगशाळा साहाय्यक संजय सोमवंशी यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. अभियंता सोमवंशी यांना निवृत्तीला चार महिने शिल्लक असताना, ते लाचखोरीच्या सापळ्यात अडकले. सोमवंशी यांच्या लाचखोरीमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील मागील २५ वर्षातील एकूण लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या आता ४४ झाली आहे.राज्यातील २७ महापालिकांमध्ये सर्वाधिक टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेत चालतात, याविषयी शासनाकडे गोपनीय विभागाचे अहवाल आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत वर्णी लागण्यासाठी शासकीय सेवेतील अधिकारी राजकीय दबाव आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मंंत्रालयात वजन असलेल्या एका गटसमुहाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.

एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात कनिष्ठ अभियंता संजय सोमवंशी पैशाची लाच स्वीकारत आहेत, अशी दृश्यध्वनी चित्रफित सोमवारी दुपारी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. या दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये अभियंता सोमवंशी हे लाच देणाऱ्या ठेकेदाराला, तो घ्यायला येतो एक आणि देतो एक. नमस्कार करतो आणि निघून जातो, असे बोलत असल्याचे दिसते. गटार आणि काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीच्या कामासाठी सोमवंशी यांनी ही लाच ठेकेदाराकडून स्वीकारली असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येते. तर, ध्वजनिधी संकलनासाठी ही रक्कम स्वीकारली असल्याचा बचावात्मक पवित्रा सोमवंशी यांनी घेतला असल्याचे प्रशासनातील चर्चेतून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon