मालेगावात ‘चड्डी बनियान’ गँगचा धुमाकूळ, एकामागे एक सहा दुकानं फोडली, शहरात खळबळ
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – मालेगावमध्ये ‘चड्डी बनियान’ गँग सक्रिय झाली असून मनमाड चौफुलीवर तब्बल सहा दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चड्डी बनियान गँगच्या चोरीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामुळे मालेगाव पोलीस अलर्ट मोडवर आले असून गँगला जेरबंद करण्यासाठी शहर व परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या मालेगावमध्ये सध्या ‘चड्डी बनियान गँग’ने धुमाकूळ घातला आहे. काल मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हार्डवेअर, विजेचा पंप, पाणी जार असे सहा दुकान ‘चड्डी बनियान गँग’ ने फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चड्डी बनियान गँग चोरी करताना थरार पुन्हा एकदा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या गँगच्या चोरी सत्राने नागरिक व व्यापाऱ्यांनी मात्र धसका घेतला असून चड्डी बनियान गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आठवड्याभरात या गँगने मालेगाव शहरात तीन ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. दरम्यान, चोरी करण्याच्या प्रकारावरून ही गँग परराज्यातील असल्याचा पोलिसांना संशय आहे. स्थानिक नागरिकांसह पोलीस देखील सतर्क झाले असून शहर व परिसरात नाकाबंदी लावून या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या गँगने घरात आणि कॉलेजमध्ये घुसून सोने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या चोरट्यांनी जवळपास ७० ग्रॅम सोने आणि ५ लाख रुपये चोरले होते. केळी चोरताना देखील ही गँग सीसीटीव्हीत झाली होती. एकीकडे चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे शहरात गाऊन गँगदेखील सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या दोही गँगला पकडण्याचे आव्हान आहे. या दोन्ही गँगला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी अशी मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.