एक लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर सीबीआय कोठडीत
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – धुळ्यातील दूध उत्पादक कंपनीच्या उत्पादनास प्रमाणित करण्यासंबंधीचे (अँगंमार्क) प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकरोड येथील पणन व तपासणी संचालनालयातील वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. न्यायालयाने संशयिताची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात धुळे येथील दुधापासून विविध उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने तक्रार केली होती. त्याआधारे सीबीआयने विशाल तळवडकर आणि अँगंमार्क नाशिक कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कंपनीने आपल्या उत्पादनास अँगंमार्क परवान्यासाठी अर्ज केला होता. बराच काळ होऊनही हे प्रमाणपत्र दिले गेले नव्हते. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात पणन व तपासणी संचालनालयाचे कार्यालय आहे. येथील अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले. स्वतः सह इतरांसाठी त्याने ही लाच मागितल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. संशयिताचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती पथकाने घेतली. तळवडकरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली.