लालपरीची चाके रुतणार! मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून एसटी कर्मचारी ९ ऑगस्ट पासून संपावर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले. सलग ५४ दिवस सुरू असलेला संप मागे २० डिसेंबर २०२१ रोजी मागे घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत. त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या या प्रकारे आहेत १)राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, २)कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी, ३)सन २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी आणि ५)सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट ५००० रुपयांची वाढ करावी. एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला करोनाकाळानंतर सन २०२०-२१ मध्ये तोटा सहा हजार कोटी रुपयांवर गेला होता. त्यानंतर तोटा कमी झाला नाही. हा तोटा ९ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन महामंडळाला राज्य सरकारवर अवलंबून राहावे लागते.