लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? संशयित आरोपी दाऊद शेखला अटकेनंतर पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती!
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या घटनाक्रमावर प्रकाश टाकला. अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, यशश्री शिंदे हिची हत्या झाल्यानंतर मंगळवारी पाचवा दिवस आहे. आम्ही आरोपीला शोधण्यासाठी त्याचा मित्रपरिवार, स्थानिकांची मदत घेतली. त्याआधारे आमचा तीन-चार जणांवर संशय होता. त्याआधारे आमचा तपास सुरु होता. पोलिसांची पथके नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये होती. दोन पोलीस पथके कर्नाटकमध्ये तळ ठोकून होती. आम्ही त्यांना इकडून इनपुटस् देत होतो. त्याआधारे आम्ही मंगळवारी सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आम्हाला दाऊद शेख याचे नेमके लोकेशन सापडत नव्हते. तो कर्नाटकमध्ये राहतो, एवढीच माहिती आमच्याकडे होती. त्याआधारे आम्ही दाऊद शेखच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलो. दाऊदच्या एका मित्राने दिलेल्या माहितीच्याआधारे आम्ही कर्नाटकमधील अल्लर गावातून त्याला ताब्यात घेतले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मोसीन हा संशयितही यशश्रीच्या संपर्कात होता. आम्ही त्याचीदेखील चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात तीन-चार संशयित होते. आम्हाला कोणताही अँगल सोडायचा नव्हता, असे पोलिसांनी म्हटले.
यशश्री शिंदे हिची हत्या केल्याची कबुली दाऊद शेख याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आली. आम्ही कर्नाटकमधून दाऊद शेखला ताब्यात घेतले तेव्हा त्याची चौकशी केली. त्यावेळी दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली. यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांची पूर्वी ओळख होती. मध्यंतरी तीन-चार वर्षे ते संपर्कात नव्हते. त्यामुळेच दाऊदने तिची हत्या केली असावी. आमची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. इतक्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, अशी पुस्ती यावेळी पोलिसांनी जोडली. यशश्री शिंदे हिचा मृतदेह उरणमधील एका झुडपात आढळून आला होता. तिच्या पोटावर, गुप्तांगावर अनेक वार होते. तसेच तिच्या चेहऱ्यासह शरीराचे लचके तोडण्यात आले होते. याविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले की, यशश्रीच्या शरीरावर ज्या भोसकल्याच्या जखमा आहेत, त्या जीवघेण्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरील जखमा कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे झाल्या असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.